श्री गजानन महाराजांचे शेगाव संबंधित माहिती
श्री गजानन महाराज |
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच एक. शेगाव येथे त्यांचे समाधी मंदिर आहे. श्री गजानन महाराज दिगंबर वृत्तीचे सिद्ध कोटीचे साधू होते. मिळेल ते खाणे, मिळेल त्या जागी राहणे, नेहमी भ्रमण करणे अशी त्यांची नित्याचीच दिनचर्या होती. त्यांच्या मुखात परमेश्वराचेच नामस्मरण, भजन असायचे. भक्तांची संकटे दूर करून त्यांना परमेश्वराचे दर्शन घडवून देण्याचे शेकडो उदाहरणे त्यांच्या चरित्रात सामील आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थानांमध्ये गणले जाणारे शेगाव स्थित गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी नेहमीच भाविक गर्दी करतात.
कसे पोहचाल?
महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, सेंट्रल रेल्वेच्या मुंबई-नागपूर मार्गावर आहे. गीतांजली एक्सप्रेस सोडून इतर सर्व रेल्वेगाड्या येथे थांबतात. स्टेशनच्या बाहेरून मंदिरापर्यंत पायी गेल्यास फक्त 15 मिनिटाचा रस्ता आहे.
स्टेशनपासून मंदिरापर्यंत येण्या-जाण्यास मोफत बससेवा उपलब्ध आहे. महाराष्ट्रातून येथे 172 बस येतात. त्या व्यतिरिक्त देवास-उज्जैन, पैठण, पंढरपूर या स्थानकांहूनही बस चालतात.
महाराजांचे मंदिर
श्री गजानन महाराजांचे मंदिर शहराच्या मधोमध स्थित आहे. मंदिराच्या महाद्वाराच्या खिडक्या रात्रभर उघड्याच असतात. श्रींची समाधी मंदिराच्या गुहेत आहे. मंदिर परिसरात वर्षभर भजन आणि प्रवचन असते. रोज सकाळी पाच वाजेपासून रात्री 9.30 पर्यंत पूजा-अर्चना विधिवत चालते. काकड आरती ते शयन आरतीपर्यंत नियमित रूपाने विविध कार्यक्रम चालतात.
प्रमुख उत्सव
श्री गजानन महाराजांचा प्रकट दिवस (फेब्रुवारी महिन्यात) तसेच त्यांची पुण्यतिथी (ऋषी पंचमीला) हे येथील प्रमुख उत्सव आहेत. त्यावेळी येथे रोषणाई केली जाते. श्रींची हत्ती, घोडा, रथ पालकी, दिंडी इत्यादींसोबत मिरवणूक निघते.
राहण्यासाठी व्यवस्था
भाविकांच्या सुविधेसाठी भव्य 'भक्त निवास' मंदिर परिसरातच बांधले आहे. त्याठिकाणी अगदी स्वस्तात खोल्या मिळतात. भाविक पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस या खोल्यांमध्ये राहू शकत नाहीत. त्या ठिकाणी भोजन कक्षेचीही व्यवस्था आहे. सकाळी अकरा ते एक पर्यंत महाराजांचा प्रसाद दिला जातो. रोज येथे जवळपास पाच हजारांवर लोक जेवण करतात. या मंदिरात दररोज वीस हजार भाविक दर्शनासाठी येतात.
अन्य आकर्षण
शहराच्या झगमगाटापासून लांब असलेल्या शेगावात साधे आणि महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाच्या सहजतेची झलक पाहावयास मिळते. आध्यात्मिक शांतीच्या शोधात असणार्या भाविकांसाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे. मंदिराच्या परिसरातच धार्मिक वाचनालय असून भाविकांसाठी सतत खुले असते. जवळच 'गजानन वाटिका' नावाचे सुंदर उद्यान आणि एक प्राणी संग्रहालय देखील आहे.
0 Comments